कळसुबाई

महाराष्ट्राचे माऊंट एवरेस्ट. कळसुबाई शिखर 5400 फूट आणि 8 वर्ष वयाच्या श्रीवर्धन ची यशस्वी चढाई.🚩🚩  
     
          रात्रीच्या गडद अंधारात साधारण 8-10*c च्या गारव्यात बारी गावच्या पायथ्यापासून साधारण रात्री 3 च्या सुमारास श्रीवर्धन ने आव्हानात्मक असलेल्या कळसुबाई शिखराच्या चढाईची सुरुवात केली. भाताची शेतवड पार पाडत मोठमोठ्या दगडानी भरलेल्या बिकट चढाईच्या वाटेची सुरुवात झाली. टॉर्चच्या उजेडातच पूर्ण ट्रेक पार करायचा होता. त्यात धुक्याचे लोट गारठा वाढवत होते. श्री ची वाटचाल न थांबता चालूच होती. बऱ्याच ठिकाणी अडखळत, ठेचकळत होता पण त्याला कोणाचाही आधार नको होता. मी स्वतः चढाई करणार हे त्याचे मत आणि ते शेवटपर्यंत त्याने पाळले याचे मला विशेष कौतुक वाटत होते. तासाभराच्या चढाईंनंतर चा उभ्या शिडीचा अवघड टप्पा त्याने सावधपणे पार पाडला. लोखंडी शिड्या धुक्यामुळे ओलसर झाल्या होत्या आणि त्यात खाली खोल दरी होती. एव्हाना 4 वाजून गेले होते. इथून पुढे उभा चढ पार करायचा होता. पहाटेच्या गारव्यात सुद्धा चढताना दम लागत होता. त्याने 5-10 मिनिट उसंत घेतली आणि पून्हा तो अवघड कडा पार करण्यास सज्ज झाला. जसं जसे वर जात होतो तसे गार वाऱ्याचा वेग वाढत होता. इतर ट्रेकर मंडळींनी शाल, स्वेटर जे काही आणले ते सर्व लपेटून घेतले. श्री सुद्धा थरथरत होता पण त्याची जिद्द काही त्याला थंड पडू देत नव्हती. " मी काही लेचापेचा नाही आहे" अस तो आईला सांगूनच आला होता. एखादी गोष्ट हाती घेतली की ती पार पाडायचीच हा त्याचा स्वभाव इथेही जाणवला. शेवटच्या उभ्या कड्याने अक्षरशः त्याची परीक्षा घेतली. 2:30 ते 3 तासाच्या चढाई नंतर 8 वर्षाचा हा लहानगा ट्रेकर कळसुबाई शिखरावर आईच्या मंदिराजवळ येऊन दाखल झाल्यावर शंभर च्या वर जमलेल्या तिथल्या ट्रेकर मंडळींनी कौतुकाने त्याचे स्वागत केले. एवढ्या गर्दीत हा एकटाच लहान ट्रेकर होता. पट्टीच्या ट्रेकर चा देखील इथे येईपर्यंत कस लागला होता. काहीजण अर्ध्यावरूनच परत फिरले होते. त्याने एक आवाहन पार पाडले होते मी त्याला एक घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती 'जिंकल्याची'. माझ्यातल्या बापाने त्याला असाच जिंकत रहा असा भरभरून आशीर्वाद दिला.

        पण, खरे आवाहन इथून पुढे चालू होणार होते. कारण शिखराच्या माथ्यावर चहूबाजूनी सुटलेला बेफान गार वारा अगदी झपाटलेला होता श्री थरथर कापत होता. मी सुद्धा काळजीयुक्त भीतीने चिंतीत झालो. आता तो उतरू शकणार नाही हे निश्चित झाले कारण चढाई पेक्षा उतरणे आणखी अवघड होते. त्याला खांद्यावर घेऊन जायचे ठरले. एव्हाना 6 वाजून गेले होते धुक्याने थैमान घातले होते. शेवटी आई कळसुबाई प्रसन्न झाली मी त्याला तिच्या स्वाधीन केले. चक्क तिच्या गाभऱ्यात मूर्तिजवळ त्याला बसवले काही वेळाने त्याची थंडी निघून गेली. आईच्या आशीर्वादाचा ऊबदार स्पर्शाचा अनुभव झाला. सूर्य नारायणाने पूर्वेच्या क्षितिजावर सोनेरी किरणांची चाहूल दिली वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. श्रीवर्धन चा देखील हुरूप वाढला आणि त्याने उतरण्यास सुरुवात केली. दगडाची वाट, निसरड्या कडा, खोल दऱ्या, हि सर्व आवाहन लिलया पार करत श्रीवर्धन ने बारी गावचा पायथा गाठला आणि त्याचा हा ट्रेक यशस्वी रित्या पार पाडला.
        धुक्यात बुडालेल्या घनदाट जंगलाच्या अवघड निसरड्या वाटेवरून त्याला एकटा जाताना पाहून माझ्यातला वडील आपसूकच त्याची तुलना आयुष्याच्या आव्हानत्मक वाटेशी करत होता. खाच खळगे, दगड, खोल दऱ्या आणि उंच पहाड म्हणजे आयुष्याचे उतार चढाव. जिद्द, चिकाटी आणि संयमाच्या जोरावर जीवनाच्या वाटेवरची कळसुबाई सारखी उंचच उंच शिखरे अशीच पादाक्रांत करता यायला हवीत अगदी श्रीवर्धन सारखी 🙏😊

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा